प्रत्येकाचं भिजणं वेगळं…..
पाऊस नुसता शब्द उच्चारला तरी आपल्याला आभाळागत भरुन आल्यासारखं वाटतं. अगदी चिंब झाल्याचा भास होतो. पण प्रत्येकाचं हे भरून येणं किंवा चिंब होणं सारखं नसतं. कारण, ज्याचा-त्याचा, अगदी प्रत्येकाचा मनातला पाऊस हा वेगळा. आणि म्हणूनच त्यात भिजणं वेगळालं असतं. प्रत्येकाची अनुभूती वेगळी, आसक्ती वेगळी आणि आवेगही वेगळाच. कुणाचा पाऊस झिमझिमणारा तर कुणासाठी ती रिमझिम. कुठे थेंब-थेंब तर कुठे धो-धो वाहत नेणारा. कुणाचा मोरपिसारा फुलवून थुई-थुई नाचणारा. कुणासाठी चिंब भिजवत मनात खोलवर प्रेम रुजवणारा. तर हाच पाऊस कुणासाठी वादळ-वाऱ्यासह अगदी सर्वस्व उध्वस्त करणारा. किती ही याची अगणित रुपं आणि तितकाच लहरी त्याचा स्वभाव. त्याच्या या लहरी स्वभावाला लक्षात घेऊनच व.पु.काळे नी प्रत्येकाच्या भिजण्याचं वर्णन काहीसं असं केलं आहे. ” पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. “
खरंच पाऊस तोच, पण त्यात भिजणाऱ्या प्रत्येकासाठी त्याचं रूप वेगळं, त्याचा मूड वेगळा. छोट्या दोस्तांसाठी उनाड आणि मनमुराद बागडणाऱ्या फुलपाखरासारखा, कुणाला प्रेमसरीत भिजवून टाकणारा प्रेमदूत तर कुणासाठी विरहाग्नीत जाळणारा, व्याकुळ करणारा. कदाचित त्याच्या या लहरी स्वभावामुळेच कि काय महाकवी कालिदासाने मेघदूत लिहिलं असावं. आषाढाच्या पहिल्या दिवशी क्षितिजावर होणाऱ्या मेघांच्या टकरी पाहूनच यक्षाने त्या मेघाबरोबर आपल्या प्रेयसीला संदेश पाठवला. या मेघाला (पावसाला) व्यक्तित्व देणाऱ्या कालिदासाची प्रतिभा काही औरच. एकूण काय, तर हा कोसळणारा पाऊस प्रत्येकासाठी वेग-वेगळी रूपं घेऊन येतो.
असा हा नानाविध रूपाचा आणि लहरी पाऊस,त्याचं स्वागतही जो-तो ज्याच्या-त्याच्या अनुभूतीनुसार आणि मूड नुसार करत असतो. “बालपणीचा काळ सुखाचा “ याचा तंतोतंत अनुभव घेत, छोटी मंडळी याचं स्वागत नाचत,बागडत करतात. दाग अच्छे है असं निरागसपणे म्हणत, डबक्यातलं पाणी एकमेकांच्या अंगावर उडवूूून पावसाची मजा लुटतात. अंगावर आणि शर्टवर केलेल्या चिखलाच्या गोंदणाला कसलीच सर नाही. पाण्यात कागदाच्या नावांची शर्यत लावण्यातली मजा काही औरचं ! ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा असं म्हणत, अगदी सर्दी होईपर्यंत,पावसात असं यथेच्छ भिजणं म्हणजे निरागसतेचं उत्तम उदाहरण.
पाऊस तोच,पण नव्याने प्रेमात पडलेल्यांसाठी तो कुणाची तरी साद घेऊन येणारा प्रेमदूत होतो. ओलेतं,धूसर वातावरण आणि त्यात प्रिय व्यक्तीचा सहवास. मग या रिमझिम पाऊस धारांमध्ये आपल्या जोडीदाराचं चिंब भिजलेलं रूप अधिकच मोहक वाटू लागतं. या चिंब आठवणी हे प्रेमी युगुल आयुष्यभर जपून ठेवतात. मग नकळतच या ओळी सुचतात. जिंदगीभर नही भूलेगी वो बरसात की रात रिमझिम बरसणारा हा पाऊस या प्रेमी युगुलांच्या ओंजळीत प्रेमाचे दान रिते करत असतो.
सहवासाची ओढ वाढवणारा हा पाऊस विरही यक्षाना मात्र व्याकुळ करतो. प्रेमीजनांना प्रेमसरीत चिंब भिजवणारा हा पाऊस या विरही यक्षाना उदासीत भिजवतो. तेच मेघ, तोच बरसणारा पाऊस, तोच अंधारलेला ओलेता दिवस आणि तोच धुवांधार नजारा. कुणाला त्यात सर्वसुखाची प्राप्ती होते तर कुणा प्रियकर/प्रेयसीला एखाद्या मेघदूताकरवी आपल्या जोडीदारासाठी संदेश पाठवावासा वाटतो. कुणी विरहिणी कुठे, सावन के झुले पडे तुम चाले आओ असं म्हणत या पावसाला प्रियकराशी भेट घालून देण्यासाठी आर्जवं करत असते. तर एखादा विरही यक्ष, लगी आज सावन की फिर वो झडी है..वही आग सीने मे फिर जल पडी है..असं म्हणत, भर पावसात तनामनाची तगमग अनुभवत असतो. कातरवेळी पडणारा हा पाऊस बाहेरच्या अंधारासोबत त्यांच्या मनातला अंधार अजूनच गडद करतो.
खरंतर या पावसाला फक्त कोसळणं एवढच ठाऊक. तो फक्त कोसळत राहतो, अगणित थेंब, मोजता न येणारे धुक्याचे कण आणि ओलसरपणा घेऊन. या जलधारा कुणाला प्रेमरंगात भिजवतात तर,कुणाला विरहाग्नीत जाळतात. पण बळीराजाला मात्र या जलधारा नवीन आशा, नव तेज, नव निर्मितीची चाहूल घेऊन येतात. वर्षभर चातकाप्रमाणे वाट बघणारा हा बळीराजा पावसाच्या पहिल्या सरीबरोबर आणि प्रत्येक थेंबाबरोबर सुखावतो. त्याच्यात नवचैतन्य संचारते.नव्या जोमाने, जोशाने तो कोरड्या ठिक्कर जमिनीतून सोनं जन्माला घालतो. पडणाऱ्या प्रत्येक थेंबातुन मोती निर्माण करण्याची कला फक्त या कलाकारालाच ठाऊक.
प्रतिभेचं दान लाभलेल्या प्रज्ञावंत कवीला ह्या पावसाने भूल नाही घातली तरच नवल! हा पाऊस जसा भरलेल्या आभाळाला मोकळं करत राहतो. तसंच हा सृजनशील,प्रतिभावान कवी त्याच्या मनात दाटलेल्या भावनाना मोकळी वाट करून देतो. जमिनीवर पडणाऱ्या टपोऱ्या थेंबाप्रमाणेच कवीच्या कागदावर शब्दरूपी मौक्तिकांची बरसात होते. कधी लडिवाळ तर कधी फटकारे मारणारा, पावसाच्या अश्या अनेक रूपांना कवी शब्दात मांडत असतो. सृष्टी बदलाचे हे सोहळे कवी, श्रावण मासी हर्ष मानसी असे म्हणत साजरे करत असतो. या पावसामुळे फक्त मातीतूनच अंकुर फुटतात किंवा फक्त झाडांनाच पालवी फुटते असे नाही. या जलबिंदूंच्या सिंचनाने कवीच्या तरल, सृजन मनालाही पालवी फुटत असते.
एकंदरीत काय, तर पडणाऱ्या प्रत्येक सरीसोबत, प्रत्येकासाठी हा पाऊस वेगळा. प्रत्येकाच्या मनातला पाऊस आणि त्याची छबी वेगवेगळी असते. मनातला पाऊस वेगळा आणि अर्थातच त्यात भिजणं हेदेखील वेगळंच.
प्रत्येक माणूस पावसात मावणारा पण हा अगाध, अनादि आणि असीम पाऊस मात्र माणसात न मावणारा
हा पाऊस कितीही अगाध, अनादि आणि असीम असला तरी प्रत्येक वेळेला तो ताजा असतो. आणि म्हणूनच जोवर पाऊस आहे तोवर शब्दांना आणि भावनांना ओल हि राहणारच.
खूप छान
Mastach👌🥰
Mastach👌🥰
Pratyekacha pavus vegla
Pratyekachya athavani veglya
❤️❤️❤️
Apratim…….
पावसाची अनेक रुपं किती सुंदरतेने मांडलीत.
शब्दरचना प्रभावी आहे.
खूप छान…!!👍