Spread the love

समुद्र आतला आणि बाहेरचा

 दुरवर पसरलेला हा विशाल,अथांग असा निळाशार समुद्र पाहिला कि नकळत त्याच्या प्रेमात पडायला होतं. त्याचं ते उनाड लहान मुलाप्रमाणे हवेच्या झोक्याबरोबर वर-खाली हिंदोळे घेणं. आपल्याला अजून त्याच्या मोहात पाडतो. पण मग बघता बघता अनेक प्रश्नांच्या लाटा उफाळून येतात. वर शांत दिसणारा हा समुद्र खोल अगदी त्याच्या गर्भात इतकाच शांत असतो? वर गंभीर दिसतो तितकाच तो आत पण गंभीर असतो का? तर उत्तर येतं, नाही.  दूरवर पसरलेला अथांग समुद्र आणि आपलं मन दोघांत बरंच साम्य आहे. जशा समुद्रात लाटा उफाळून येतात तशाच मनातही उसळतात. वादळं दोन्हीकडे घोंघावतात.  

कुणालाही न दिसणारी कितीतरी वादळं त्याच्या गर्भात घोंघावत असतात. वरकरणी किती सुंदर आणि तालबद्ध दिसतात या लाटा. एखाद्या विषारी नागाप्रमाणे फेसाळत किनार्‍यावर आदळतात. तेव्हा त्याच्या आत कितीतरी पटीने अतृप्तता भरलेली असते याचा अंदाजही आपल्याला करता येऊ शकत नाही.        

मनाचंही या समुद्रासारखंच असतं नाही? वरुन सुंदर दिसणारा हा समुद्र आतून वादळांनी भरलेला आहे. वरुन शांत पण आतून प्रचंड अशांत. तसंच काहीसं आपल्या मनाचंही असतं…     

Beauty is mysterious as well as terrible. God and devil are fighting there, and the battlefield is the heart of man.      

कितीतरी साम्य आहे या अथांग सागर आणि आपलं मन या दोघांत. दोघेही अथांग, गहिरे आणि अगम्य ! समुद्र त्याच्या अंतरंगातील घणाघाती वादळाची पुसटशी रेष ही उमटू देत नाही बाह्यरंगावर…तो आतला आणि बाहेरचा वेगवेगळा असतो.      

आपल्या मनाचंदेखील असच असतं. मनाचं प्रतिबिंब कधीच चेहर्‍यावर येत नाही. मनाच्या खोल तळाशी निरनिराळ्या भाव-भावनांचे डोंब उसळत असतात. नाना विचारांच्या, प्रश्नांच्या विषारी लाटा सतत आदळतात मनाच्या किनार्‍यावर. कधी मनाच्या आत खोलवर अनेक कटू-गोड आठवणींचं मदमस्त पाखरु भिरभिरतं. तर कधी भविष्याचे सप्तरंग उमटतात या अंतरंगाच्या पटलावर. प्रेमही असतं तिथेच आणि कुणाच्यातरी विरहाची सल ही तिथेच असते. कुठेच आणि कसलीच साखळी नसते या विचारांच्या श्रृंखलेला. फक्त एकावर एक येणाऱ्या लाटांप्रमाणेच मनाच्या किनार्‍यावर आदळत राहतात.            

बा. भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे “समुद्र बिलोरी ऐना”. (ऐना-आरसा). किती समर्पक उपमा आहे ही. समुद्र आरसाच आहे आपल्या मनाचा. त्याच्यात आपण आपल्या मनाचं प्रतिबिंब बघू शकतो.

प्रत्येकाचा आतला आणि बाहेरचा समुद्र वेगळा असतो. अगदी आपल्या मनाप्रमाणेच बाहेरुन शांत, गंभीर, स्थितप्रज्ञ.पण आतून तितकंच अशांत,अधीर,गहन आणि गहिरं….        

मन गहिरं-गहिरं कितकं….

या अथांग सागराइतकं… 

मन चंचल-चंचल कितीक…

या उधळत्या लाटांइतकं….. 

मन अधीर-अधीर कितकं…

हातून निसटत्या वाळूइतकं….   

मन धीर-गंभीर कितंक… 

या अतृप्त किनार्‍याइतकं……      

  1. Snehal Jadhav

    👌👌👌khupach mast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *